शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी यांचे वतीने पिंपरी चिंचवड विभाग खुल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक १०/१०/२०२३ ते१३/१०/२०२३ कै मारूतराव लांडगे कुस्ती संकुल भोसरी, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत महिला गटातील अंतिम सामना क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी संघ व महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी यांच्यात २६-२५ असा अटीतटीचा होऊन क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी संघाने १गुणांच्या फरकाने जिंकत पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या कबड्डी निवड चाचणीच्या प्रथम ऐतिहासिक विजयी चषकावर आपले नाव कोरले.
पूजा शेलार शिवछत्रपती कबड्डी पुरस्कारार्थी , मानसी रोडे वरिष्ठ गट राष्ट्रीय खेळाडू, ,आर्या पाटील अर्चना झोरे ,कल्याणी कुदाळे , अनुष्का फुगे दिव्या गोगावले इत्यादी राष्ट्रीय खेळाडूंसह उत्तम खेळाडूंचा भरणा असलेला श्री महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कबड्डी संघ तर मनीषा राठोड ,भूमिका गोरे ,प्रतिक्षा लांडगे,रुपाली डोंगरे, कीर्ती कडगंची, सविता गवई, पूजा तेलंग, श्रावणी सावंत, रेखा राठोड, शिफा वस्ताद, विद्या गायकवाड, निकिता माळी इत्यादी शालेय व कुमार राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी संघाचा रोमहर्षक सामना मध्यंतराला १०-११ अशा गुणांवर थांबला. महापालिकेच्या कबड्डी संघाची १गुणाची आघाडी सामना संपायला ५ मिनिटे राहिले असताना ४ गुणांची झाली, परंतु राष्ट्रीय वरिष्ठ खेळाडू मानसी रोडे हिने आपल्या एकाच उत्कृष्ट चढाईत महानगरपालिकेच्या मैदानात राहिलेल्या दोन खेळाडूंना टिपत लोण टाकून सामना ३५-३५ गुणांवर नेला. सामना संपायला काही सेकंद शिल्लक राहिले असताना महानगरपालिकेच्या उत्कृष्ट चढाई पट्टू मनीषा राठोडने निर्णयाक चढाई करत १ गुण टिपला आणि सामना संपला. सांघिक प्रयत्न , उत्कृष्ट रक्षण, संयमीत खेळ यांच्या जोरावर महापालिकेने विजयश्री खेचून आणली.
विजय संघाचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक श्री बाबुराव चांदेरे, श्री मिनीनाथ दंडवते उपायुक्त क्रीडा विभाग , श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री परशुराम वाघमोडे प्रशासनाधिकारी क्रीडा विभाग,पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक श्री दत्तात्रय झिंजुर्डे, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, श्री राजेंद्र काळोखे, श्री संदीप पायगुडे, श्री योगेश यादव, श्री दीपक धावडे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.
सदर संघाला श्री बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्रीमती सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री संतोष बारणे यांचे सहकार्य लाभले.