शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी । प्रतिनिधी : चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्याच्या तब्बल ७ नवीन रस्त्यांच्या कामाला प्रशासनाने गती दिली आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. दि. २६ व दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
वर्षभर चिखली व तळवडे भागातील ७ रस्त्यांचे आगाऊ ताब्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी मनपातर्फे दि. २६ व दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चिखली गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली तसेच तळवडे गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
मौजे चिखली व तळवडे येथील मंजूर विकास योजनेतील खालीलप्रमाणे ७ रस्त्यांच्या आगाऊ ताब्याची कार्यवाही भूसंपादन कायदा २०१३ अन्वये जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत सुरू आहे. तर काही रस्त्यांची भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२ मी/१८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १३७० मीटर). २) चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२ मी, २४ मी व ३० मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २०३० मीटर). ३) चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी. पी. रस्ता (रस्त्याची लांबी २२५० मीटर). ४) चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २००० मीटर). ५) तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रुंद उर्वरित रस्ता (रस्त्याची लांबी ४०० मीटर). ६) तळवडे येथील तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १९५० मीटर). ७) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.००मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता (रस्त्याची लांबी २१०० मीटर). या रस्त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.