शबनम न्युज | नागपूर
नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली.
नागपूर येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर ही घोषणा करण्यात आली. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स कळ दाबत या विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासनातर्फे ७० कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रमुख पाहुणे डॉ.आफिनिता चाई चाना, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य डॉ.कमलाताई रा.गवई, अॅड. मा.मा. येवले, डॉ. सुधीर फुलझेले, अॅड आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ.राजेंद्र गवई, डी.जी.दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,भन्ते नाग दीपांकर,प्रादेशिक उपाआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची उपस्थिती होती.
दीक्षाभूमीच्या विकास कामाचे ई-भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश प्रक्षेपित करण्यात आला. 200 कोटींचे विकास कार्य दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून सर्व कामे जागतिक मानांकनाची व गतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हीडीओ शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.