शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी वाणिज्य विभागाच्या वतीने “Importance of Soft Skills as per Corporate World ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारी यांनी करतांना वाणिज्य शाखेतील करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत या संदर्भात विवेचन करून आधुनिक काळात मराठी बाराखडीतील ‘क’ हा करिअरचा कसा झाला आहे असे मत व्यक्त करून सॉफ्ट स्किलची आवश्यकता विशद केली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. गौरी कुलकर्णी -विकास अधिकारी, निलया फाउंडेशन, पुणे.यांनी कॉर्पोरेट जगात सॉफ्ट स्किलची आवश्यकता कशी महत्वपूर्ण आहे या संदर्भात मार्गदर्शन करतांना महाविद्यालयीन तरुणांच्या जीवनात तन -मन -धन या घटकांची कशी आवश्यकता आहे यावर भाष्य केले तसेच सॉफ्ट स्किल वाढविण्यासाठी मनाचे सामर्थ्य, बुद्धीचे सामर्थ्य, व्यक्तिमत्त्वाचे सामर्थ्य व नैतिकतेचे सामर्थ्य या गुणांची आवश्यकता विशद केली.
ज्या व्यक्तीमध्ये शहाणपणा, दयाळूपणा व साहस या तीन गुणांचा समन्वय असतो ती व्यक्ती निश्चितच श्रेष्ठ ठरते या संदर्भात मोहम्मद पैगंबर,डॉ.बी.आर. आंबेडकर, गौतम बुद्ध, सुवर्णपदक विजेती रुडॉल्फ विल्मा यांच्या जीवनातील विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी वाणिज्य शाखेचे महत्त्व स्पष्ट केले तसेच वाणिज्य शाखा ही व्यक्तीला जगायला शिकवते असे मत व्यक्त करून मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या महत्वपूर्ण गरजा बरोबरच संगणक ज्ञान व भाषा ज्ञान अवगत करणे आवश्यक गरज असून मन मेंदू व मनगट मजबूत असेल तर यश नक्की मिळते या संदर्भात विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री.मयूर मुरलीधर ढमाले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला प्रा. संजीव कांबळे, प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. परमेश्वर भत्ताशे,प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज, प्रा.सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे,प्रा.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पूजा खवले, श्री.प्रविण भावे,सौ. वर्षा ताजणे, कु.नेहा लांडगे इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मिटकरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले. या कार्यक्रमाची सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.