राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने वंचित घटकांची दिवाळी गोड
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने यंदाची दिवाळी वंचित घटकांसोबत साजरी झाली, ही संकल्पना राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी अमलात आणली. दिवाळी हा सण आनंदाचा सण सर्वच जाती, धर्मातले कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात. हा दिवाळी सण गरीब, निराधार व्यक्तींनीही आनंदाने साजरा करावा, या हेतूने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत रस्त्यावर तसेच वस्त्यांवर बेघर असलेल्या आणि निराधार कुटुंबातील नागरिकांसोबत तसेच गरीब परिस्थितीमुळे संघर्षमय जीवन जगणाऱ्या लहान बालकांसोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी सण साजरा केला. हा उपक्रम करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्य अध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
समाजात प्रवाहापासून दूर असलेल्या लोकांच्या जीवनात क्षणभर जरी आनंदाचा प्रकाश आपण निर्माण करू शकलो, तर जीवन सार्थ ठरेल, अशी भावना यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, पिंपरी, कासारवाडी, डांगे चौक, भोसरी अशा विविध ठिकाणी हा दीपावलीच्या निमित्ताने उपक्रम राबविण्यात आला.
वंचित घटकांची दिवाळी गोड करण्याचा छोटा प्रयत्न निश्चितच दिवाळी सण हा विधायक पद्धतीने साजरा केल्याचे समाधान देणारे आहे, समाजातील वंचित घटकांच्या सुखदुःखात राष्ट्रवादी युवक कायम सहभागी असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील असाही विश्वास शहराध्यक्ष शेखर काटे यांनी यावेळी व्यक्त केला.