शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुण्यातील प्रख्यात ‘कोहिनूर’ समूहाचे अध्यक्ष आणि उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये सातत्याने भरीव योगदान देणारे कृष्णकुमार गोयल यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे विविध ७० संस्थांतर्फे भव्य नागरी गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते हा गौरव संपन्न होईल. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते ‘माणसातला कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होईल. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशन, मुंबईचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे करणार आहेत.
या कार्यक्रमात ‘चैत्रबन’ हा अवीट मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी कृष्णकुमार गोयल गौरव समिती स्थापन करण्यात आली असून ‘संवाद, पुणे’च्या सहयोगातून हा कार्यक्रम संपन्न होईल.
या कार्यक्रमास येणाऱ्यांनी कृपया फुलांचा हार, गुच्छ आणू नये. जर काही द्यावेसे वाटत असेल, तर याप्रसंगी कृष्णकुमार गोयल यांना पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन गौरवसमितीतर्फे सुनील महाजन यांनी केले आहे.