शबनम न्युज | नागपूर
माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करुन जागतिकस्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.
नव्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची गरज प्रतिपादित करुन राष्ट्रपती म्हणाल्या की, वैश्विक स्तरावर सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय साध्य करण्यात डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा लाभ प्राप्त होण्यात असमानता निर्माण झाली आहे. ती दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालय संलग्नित वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास मदत केली जात आहे. यामुळे प्रादेशिक असमतोल आणि शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य सेवांच्या विकासासोबतच त्या परवडणाऱ्या असाव्यात, या उद्देशाने जगात सर्वात मोठी असणारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याचे सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.