शबनम न्युज | पुणे
ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचे रुग्णालयातील पायाभूत सुविधांकडेही लक्ष नव्हते. वारंवार लिफ्टमध्ये होणार बिघाड, सामान्य रुग्णांना मिळणारी सेवा, रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास याकडे सतत अधिष्ठात्यांनी दुर्लक्ष केले. रुग्णांसह नातेवाईक व डॉक्टर्स, नर्स यांच्या जीवाशी ससून रुग्णालयाचे प्रशासन खेळत आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
सुरवसे पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले असून, लिफ्टच्या संबंधित अधिकाऱ्यांसह डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, ससून सर्वोपचार रुग्णालयातील लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या चौथ्या ते पाचव्या मजल्यावर लिफ्ट अडकली होती. त्यामध्ये सहाजण सुमारे एक तास अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अक्षरशः ही लिफ्ट कापून आतील नागरिकांना बाहेर काढले. श्वास कोंडल्यामुळे या नागरिकांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. तरीही प्रशासनाला जाग आली नाही आणि १८ नोव्हेंबरला रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा अडकली. त्यात डॉक्टर आणि नर्ससह तीनजण अडकले होते. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर लिफ्ट पुन्हा सुरू झाली. या अर्ध्या तासाच्या कालवधीत डॉक्टर आणि नर्स यांना लिफ्टमध्ये श्वास घेणे अवघड झाले होते. यावरून हेच सिद्ध होत आहे की, ससून रुग्णालयातील लिफ्टची देखभाल दुरुस्ती वेळेवर व योग्यरित्या होत नसून सर्वसामान्यांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे.
लिफ्ट बंद पडण्याच्या दोन्ही घटनांत सुदैवाने कोणाचेही प्राण गेले नाहीत. मात्र, ससून प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसून, अशा प्रकारची घटना पुन्हा घडून कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने पाहून ससून मधील सर्व लिफ्ट संदर्भात आढावा घेण्यात यावा. गरज असल्यास नवीन लिफ्ट बसवण्यात याव्यात. लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व अधिष्ठात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी यांच्याकडे केली आहे.
'ससून'सारख्या महत्वाच्या आणि कायम गर्दी असणाऱ्या रुग्णालयात वारंवार लिफ्ट बंद पडणे गंभीर बाब आहे. दोन्ही घटनात लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव गुदमरला होता. सुदैवाने वेळेत मदत मिळाली म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पीडब्लूडी अधिकारी व ससून प्रशासनातील अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले असण्याची शक्यता आहे. लिफ्टची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसून, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व दुर्लक्ष करणाऱ्या ससून प्रशासन, डीन व पीडब्लूडी अधिकाऱ्यांची चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल व्हावा.
- रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस