शबनम न्युज | लातूर
राज्यात खेळ संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर( तालुका क्रीडा संकुल )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ. हनुमंत लुंगे, जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश साकोळकर, उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, यांच्यासह विविध स्पर्धा असोसिएशनचे पदाधिकारी, आठ प्रादेशिक विभागाचे खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
राज्याचा क्रीडामंत्री होऊन चार महिने झाले आहेत, या काळात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगून त्यात विभागीय क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपये, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 50 कोटी रुपये, तालुका स्तरावरील क्रीडा संकुलासाठी 10 कोटी तर ग्रामपंचायत स्तरावर पूर्वी 7 लाख होते ते आता 14 लाख रुपये केल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.