शबनम न्युज | मुंबई
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
गोरेगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसळकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलिस दलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
राज्यपाल बैस म्हणाले की, हरियाणा येथे आयोजित आखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर -२०२३ स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने सहा सुवर्ण चार रौप्य व बारा कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्स २०२३ विनिपेग कॅनडा येथे आयोजित कुस्ती /बॉडी बिल्डिंग/ फिझिक्स बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके प्राप्त केली आहेत. मुंबई येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय आणि साऊथ एशियन रब्बी स्पर्धेत- २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस रब्बी संघाने कांस्यपदक प्राप्त केले आहे.