शबनम न्युज | पुणे
नववर्षानिमित्त सूर्यदत्त ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव आणि ‘एज्यु-सोशिओ कनेक्ट’ अभियानांतर्गत आंबी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी तेथील वृद्धांशी संवाद साधत त्यांना सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी बनविलेल्या रजईचे, तसेच सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ट्रॅव्हल अँड टुरिजमच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आरोग्यवर्धक लाडूचे वाटप करण्यात आले.
‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थी व शिक्षकांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवला. संपूर्ण परिसराला भेट देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस केली. या संवाद भेटीने ज्येष्ठांना आपलेपणाचा व ओलाव्याचा क्षण अनुभव करता आला. विद्यार्थी त्यांच्याशी विविध खेळ खेळण्यात, गाणी गाण्यात रममान होऊन गेले. सोनल शहा यांनी जनसेवा फाउंडेशनची आणि वृद्धाश्रमातील दैनंदिनीची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. नवीन वर्षाचे स्वागत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले.
येथील ज्येष्ठ नागरिकाना भेटता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्याशी बोलताना परिस्थितीनुरूप त्यांनी स्वतःला कसे बदलले आहे आणि आजूबाजूच्या सहकाऱ्यांशी कसे जुळवून घेतले आहे, ते पाहता आले. प्रत्यक्ष अनुभवता आले, अशी प्रतिक्रिया कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा व वीणा शहा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत असून, वृद्धाश्रमातील व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट केले. ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ अंतर्गत विद्यार्थ्यांना नात्याचे महत्व कळावे, भारतीय कुटुंब व्यवस्थेचे, संस्कृतीचे महत्व समजावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमाला भेट देण्याचा उपक्रम राबविल्याचे चोरडिया यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर, रोहित संचेती, डॉ. कांचन गोडे, डॉ. श्रीकांत म्हसे, डॉ. अंजली शर्मा, प्रेम सूर्यवंशी, प्रज्योत भालेराव, भाटू पाटील, नितीन कामठेकर आदींनी या भेटीकरिता संयोजन केले. जनसेवा फाउंडेशन, आंबी येथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.