नवतंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागामुळे शहराचा कायापालट
पुणे : “स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होत आहे. नवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव, नाविन्यपूर्ण योजना, काटेकोरपणे अंमलबजावणी आणि वाढता लोकसहभाग यामुळे विस्तारणारे पुणे शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन, प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे २०५० पर्यंत पुणे शहराच्या विकासात आणखी भर पडेल,” असे प्रतिपादन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी केले.
Advertisement
बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित ‘पुणे व्हिजन २०५०’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. संजय कोलते बोलत होते. सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या चर्चासत्राप्रसंगी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, कर्नल संजय अडसर, ‘बीएआय’चे व्हाईस चेअरमन सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे, माजी अध्यक्ष मनोज देशमुख, कन्स्ट्रो प्रदर्शन अध्यक्ष जयंत इनामदार, अनेक स्थापत्य अभियंते, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत, सीओईपी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सदगीर, बांधकाम व्यावसायिक, ‘बीएआय’चे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ‘सीओईपी’ची विद्यार्थिनी अभियंता आदिती खुर्द हिचा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ मध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. संजय कोलते यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी, विविध योजना यासह ‘पीएमपीएल’कडून प्रवाशांना अधिक सुलभ व सुकर वाहतूक देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘पीएमपीएल’मध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शाश्वत पायाभूत सुविधा, स्मार्ट तंत्रज्ञान, सर्वंकष विकास, प्रभावी प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्किटेक्ट शिरीष केंभावी म्हणाले, “पुण्याचा विस्तार काळानुसार वाढला आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी क्षेत्रातही बदल झाले आहेत. बांधकाम क्षेत्र सध्या तेजीत आहे. ‘एसआरए’ स्कीमअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन होत आहे. यामुळे पुंणे अधिक विस्तारत असून, लोकांचा पुण्यात राहण्यास येण्याचा कल वाढत आहे. स्थापत्य विकासात आर्किटेक्टचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आपटे यांनी केले.
—————————-
सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालय : ‘पुणे व्हिजन २०५०’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना डॉ. संजय कोलते. यावेळी डावीकडून शिरीष केंभावी, डॉ. कोलते व कर्नल संजय अडसर.
Advertisement