शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. पुण्यात ‘निर्भय बनो’ हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, हा गोंधळ झाला. दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया आज पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.
यावेळी पुणे पोलीस म्हणाले, राष्ट्रीय सेवा दलाने आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मी हे जबाबदारीने सांगू शकतो की, या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. परंतु निखिल वागळे येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. कारण त्यांच्यावर कालच पुणे शहरात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती, त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती. मात्र, ते त्यांच्या खाजगी गाडीतून निघाले. त्यांनी पोलीस सुरक्षा घेतली नाही. ते कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केली.
तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल, आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणि डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.