गटई कामगारांच्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून योग्य ठिकाणी पुनर्वसन करा
-
गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निर्देश
-
चर्मकार विकास आयोग होणार पुनर्जिवित
मुंबई, दि. १२ – शासनाने गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका, नगरपालिकांना दिल्या आहेत. चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच चर्मकार विकास आयोगाला पुनर्जिवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवंडी येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दिले.
चर्मकार समाजबांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार विलास लांडे, माजीमंत्री बबनराव घोलप, महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास उर्वरित कर्जमाफी करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महामंडळाला दिल्या. परदेश शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे सांगून रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामधील रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
चर्मकार समाजातील युवकांसाठी प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र, उत्कृष्टता केंद्र तसेच स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी गोवंडी येथे महामंडळाला दोन एकर जागा देण्यात आली असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे, हा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करुन महापालिकेने हे केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉल्स दिले असून रस्ता रुंदीकरण अथवा इतर कारणांमुळे विस्थापित होणाऱ्या स्टॉल्सधारकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यायी जागा देण्याच्या सूचना देतानाच या गटई कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याच्या दृष्टीने विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महामंडळाकडून घेतलेल्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी विशेष योजना लागू करण्याच्या दृष्टीने विभागाने तपासणी करावी तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन स्टॉल्स तयार करावेत, तसेच वांद्रे येथील चर्मकला विद्यालयातील रिक्त पदे भरून येथे प्रशिक्षण सुरु करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर समिती तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईतील २२० शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले असून तेथील प्रशिक्षणाचा तसेच विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.
बैठकीस भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय गोतिसे, भाऊसाहेब कांबळे, रमेश बुंदिले, अशोकराव माने, गोपाळसिंह बच्छिरे, रविंद्र राजुस्कर, उमाकांत डोईफोडे आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.