शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील म्हेत्रे वस्ती चिखली परिसरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 92 या शाळेमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष यश दत्ता काका साने यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात यश साने यांनी नमूद केले की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेची इमारत चार मजली असून त्यामध्ये एकूण 15 वर्ग आहेत त्यापैकी केवळ अकरा वर्ग हे वापरात आहेत ,ज्यामध्ये सकाळी सहावी सातवी आणि आठवी व दुपारी पहिली ते पाचवी चे वर्ग भरविले जातात.
सदरची शाळा ही फक्त आठवीपर्यंत आहे. सदर शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असून 800 च्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आठवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांची संख्या ही किमान 92 ते 95 च्या दरम्यान असते व प्रत्येक वर्षी आठवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे आठवीपर्यंतचे शिक्षण सदर शाळेत घेऊन त्यानंतर पुन्हा नवीन शाळेत प्रवेश घेण्याकरिता दुसऱ्या शाळेत जात असतात परंतु कोणत्याही शाळेत गेल्यास सदर ठिकाणी त्या शाळेची पटसंख्या ही पुरेशी असल्याने आठवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी यांना पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या शाळेतच म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 92 म्हेत्रे वस्ती शाळेतच नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.