शबनम न्युज | मुंबई
देशाच्या विकासात आता चंद्रपूर महत्त्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्यांच्या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्या विकासातही हातभार लावेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.
त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल न्यू ईरा व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, आलोक मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोळसा, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्थापन झालेले उदयोग भविष्यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्या कंपन्यांच्या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्टीम’ तयार करण्यासोबतच एअरपोर्ट, रेल्वे, रस्ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.