शबनम न्युज | पुणे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (आयआयआटी पुणे) प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार आहे. पुढील वर्षी शैक्षणिक वर्षात १५ टक्के जागांची भर पडणार असून, टप्प्याटप्प्याने पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. अभ्यासक्रमांची एकूण विद्यार्थिसंख्या अडीच हजारांपर्यंत वाढवली जाणार आहे. संस्थेचे संचालक डॉ. ओमप्रकाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संस्थेचे कुलसचिव डॉ. मुकेश नंदनवार, प्रा. चंंद्रकांत गुलेड, प्रा. संजीव शर्मा, प्रा. सुशांत कुमार या वेळी उपस्थित होते.
आयआयआटी पुणे ही सार्वजनिक खासगी तत्त्वावरील अभियांत्रिकी शिक्षण संस्था २०१६ मध्ये स्थापन झाली. जेईईच्या माध्यमातून या संस्थेत राष्ट्रीय स्तरावरून प्रवेश प्रक्रिया होते. २०२० मध्ये झालेल्या करोना विषाणू प्रादुर्भावामुळे संस्थेचा पदवी प्रदान कार्यक्रम झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर पहिला पदवी प्रदान कार्यक्रम शनिवारी (२३ मार्च) काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पदव्युत्तर पदवीच्या आठ विद्यार्थ्यांना, तर पदवीच्या आठ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे.