शबनम न्युज | मुंबई
पुढील 15 दिवसात मी स्वगृही परतणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना दिली. “माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली. त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निर्णय घेतला आहे,” असे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले, माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचे म्हणणे होते की, मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवे. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे त्यांना कळवले होते. परंतु मी आता काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील पंधरा दिवसांचे आत माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती खडसे यांनी दिली.