पुणे लोकसभेत तिरंगी नाहीतर चौरंगी लढत
शबनम न्यूज , प्रतिनिधी पुणे :
पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता ए. आय. एम. आय. एम. अर्थात ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्यावतीने महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी वतीने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच महायुतीवतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, रवींद्र धंगेकर विरोधात मुरलीधर मोहोळ अशी दुहेरी लढत होत असतानाच वंचित बहुजन आघाडी वतीने माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने होत असलेली तिरंगी लढत आता ए. आय. एम. आय. एम. पक्षाने अनिस सुंडके यांना दिलेल्या उमेदवारीमुळे ही लढत आता चौरंगी होणार आहे.
आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी मुस्लिम समाजाचा वोट बँक म्हणून वापर केला आता आम्ही समाजबांधवांना त्यातून बाहेर काढणार आहोत आमची स्वतंत्र राजकीय ताकद आम्ही दाखवून देऊ असे अनिस सुंडके यांनी सांगितले.
अनिस सुंडके पुणे महापालिकेत नगरसेवक पदावर कार्यरत होते तसेच मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे ,मागील वीस-पंचवीस वर्षाची त्यांची राजकीय कारकीर्द असल्याने ए आय एम आय एम पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असल्याचे सांगितले जात आहे.