शबनम न्युज | पुणे
श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे रविवार दि 21 एप्रिल रोजी मार्च 1981 बॅच च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या बॅचला शिकवणाऱ्या श्री चित्ते, श्री अवसरे, श्री खंडागळे, श्री घाडगे या गुरुवर्यांची व शिक्षकेतर श्री रामभाऊ जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन त्या बॅचचे विद्यार्थी प्राचार्य डॉ हरीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रम स्थळी संयोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी प्रा अरविंद वाघमोडे, श्री किसन यादव, श्री तानाजी सोलनकर व श्री भगवान गोरे यांनी केले. त्याकाळी अत्यंत कठीण आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक कालखंडातून या गावाची पार्श्वभूमी जात असताना या बॅचमधील विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात कसे संपन्न झाले याचा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या भाषणात ऊहापोह केला. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि हृद्य वातावरणात हा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा भोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी सतत संपर्कात रहावे व विद्यालयाच्या अडचणी समजून घ्याव्यात, तसेच विद्यालयास मार्गदर्शनही करावे असे प्राचार्या मनीषा भोसले म्हणाल्या. वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या सर्व गुरुवर्यांनी आपल्या उत्तम आरोग्याविषयीचे सल्ले माजी विद्यार्थ्यांना दिले.
इतक्या वर्षानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटताना सर्व गुरुवर्यांना व विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते. कार्यक्रमादरम्यान विवाहोत्तर डाळज नं 2 या गावच्या सौ शकुंतला जगताप शिंदे या विद्यार्थिनीचा सरपंच पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. नलिनी भोसले, उषा देटगे, मनोरमा जगताप, उत्तम नरबट चंद्रकांत सावंत, मोहन पाटील, बबन देवकर, हनुमंत भोसले, तुकाराम जगदाळे, बाळू इनामे, विजय कुलकर्णी हे विद्यार्थी हजर होते. माजी विद्यार्थी संघटने कडून विद्यालयास विविध तंत्रज्ञान युक्त सुविधा तसेच उत्तम लॅब, उत्तम लायब्ररी या संदर्भात नजीकच्या काळात सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे भरीव मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थी प्राचार्य डॉ हरीश कुलकर्णी यांनी केले. डॉ कुलकर्णी यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.