शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील छोटे व्यावसायिक, भाजीविक्रेते, हातगाडी व्यवसाय व किरकोळ धंदेवाईक यांना आपले व्यवसाय दैनंदिन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका स्वाती माई काटे यांनी पिंपरी चिंचवड चे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी तसेच भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नगरसेविका स्वाती माई काटे यांनी नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक 30 दापोडी पूर्णपणे हात मजुरीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे वास्तव्य असलेले प्रभाग आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे असलेल्या परिस्थितीत शासनाने केलेल्या लॉक डाऊन मुळे या छोट्या व्यवसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तसेच भाजी विक्रेते हे दिवसाआड व्यवसाय करू शकत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना काम धंदे राहिले नाही. उपासमार सुरू आहे. असंच दिवस आड व्यवसायिक करणे शक्य नाही. तरी या छोट्या दुकानदारांना तसेच हातावर पोट असलेल्या भाजीविक्रेते व इतर दुकानदारांना यांना दैनंदिन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका स्वाती माई काटे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.