पिंपरी, ता. 11 : “ वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन दृष्टीहीन बांधवांनी तयार केलेल्या वस्तु खरेदी करुन त्यांच्या हाताला बळकटी देण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन संदेश बोर्डे स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी केले.
दृष्टीदान दिनानिमित्त फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी चिंचवड (इंदिरानगर) येथील आस्था हॅन्डीक्राफ्ट संस्थेला गुरुवार (ता.10) रोजी भेट दिली. दरम्यान, फाऊंडेशन सदस्य प्रमिला बोर्डे, प्रेरणा दळवी, स्नेहल गायकवाड, डॅनीयल दळवी, मोहित भोसले, संदिप खरात आणि सुशांत बनकर यांनी आपला जून महिन्यातील वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन आस्था हॅन्डीक्राफ्ट संस्थेतील दृष्टीहिन बांधवांनी पाहिलेले हरीत भारताचे स्वप्नाला हातभार म्हणुन “ सीड बॉल ” खरेदी केले. अशा वेगऴ्या अनोख्या पद्धतीने फाऊंडेशन ने साजरा केलेला वाढदिवस उपस्थितांसह सर्वांच्या कायम स्वरुपी स्मरणात राहणारा असाच ठरणारा आहे.
या प्रसंगी आस्था हॅन्डीक्राफ्ट संस्था अध्यक्ष पराग कुकुलोळ, फाऊंडेशन अध्यक्ष संदेश बोर्डे, सायली साळवी, सियोना दळवी, शनाया बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भावना व्यक्त करताना संदेश स्पोर्टेस् फाऊंडेशन अध्यक्ष संदेश बोर्डे म्हणाले की, “ दृष्टीहीन बांधवांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले आहेत. उत्तम गायक, वादक आपली कला सादर करुन हि कलाकार मंडळी आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह चालवितात. शिवाय विविध क्षेत्रात काम करुन मुख्य प्रवाहात आपले स्थान निर्माण करतात. हे खरच कौतुकास्पद बाब आहे. समाजातील विविध घटकांनी अशा बांधवांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. वाढदिवसानिमित्त केला जाणारा अनावश्यक खर्च टाळुन दृष्टीहीन बांधवांनी तयार केलेले सीड बॉल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”
आस्था हॅन्डीक्राफ्टस् संस्था अध्यक्ष पराग कुंकुलोळ म्हणाले की, “ दृष्टीहीन बांधवांकडे दृष्टी नसली तरी दूरदृष्टी असते. सध्याच्या घडीला ऑक्सिजनचा तुटवडा पाहता वृक्ष संवर्धनासाठी दृष्टीहीन बांधवांनी अडीच लाख सीड बॉल ची निर्मीती केली आहे. भविष्यातील हरीत भारत करण्याचा त्यांचा मानस आहे. पर्यावरणातील ऑक्सिजन वाढीसाठी दृष्टीहीन बांधवांचा हा अभिनव उपक्रम नक्कीच सर्वांना जीवनदायी असा ठरणार आहे. अशा बांधवांना मदत करण्यास संस्था सदैव तत्पर आहे.”