शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगपालिका केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांना (वयोगट – १८ ते ४४ व ४५ वर्षापुढील) मोफत कोविड लसीकरण अभियान राबवित आहे. नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने व केंद्रांवर टोकन उपलब्ध करून दिले जाते. केंद्रावर दिल्या जाणाऱ्या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. नागरिकांमध्ये वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भभवत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या किओक्स (KIOSK) मार्फत नागरिकांना प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या संकल्पनेनुसार मंगळवारी (दि. २/०८/२०२१) पासून पालिकेच्या अण्णा साहेब मगर स्कूल व ड क्षेत्रिय कार्यालयांमधून किओक्स KIOSK द्वारे केंद्रीय पध्दतीने टोकन उपलब्ध देण्यात आले आहे.
या KIOSK द्वारे उपलब्ध करून देणेत आलेली संगणक प्रणालीनुसार नागरिकांने आपल्या राहत असलेल्या मनपाच्या आठ क्षेत्रिय कार्यालयापैकी जवळील क्षेत्रिय कार्यालयामध्ये येऊन KIOSK मध्ये आपला मोबाईल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस इत्यादीची नोंद करून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा OTP, KIOSK मध्ये नोंदवून नागरिक आपली माहिती समाविष्ठ करू शकतात. नोंद झाल्यानंतर नागरिकांस KIOSK मधून छापिल टोकन क्रमांक प्राप्त होईल तसेच टोकन क्रमांक SMS द्वारे नागरिकांस पाठविणेत येईल. या पध्दतीने नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झालेनंतर शासनामार्फत उपलब्ध होणा-या दररोजच्या डोस संख्येनुसार केंद्रीय पध्दतीने नागरिकांची निवड करून संगणक प्रणालीद्वारे SMS पाठवून नागरिकांनी निवड केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये बोलावण्यात येईल.
द्वितीय डोसबाबत ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसीकरणासाठी ८४ दिवस व ‘कोव्हॉक्सीन’ लसीकरणाचे २८ दिवस पुर्ण झाले असतील तरच नागरिकांना दूसरा डोस देण्यात येईल. या दिवसांची पुर्तता झाली नसल्यास संबंधित क्रेंदावर नागरिकांना डोस नाकारण्यात येईल. नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाल्याशिवाय संबंधित मोबाईल क्रमांक नागरिकांस टोकन घेण्यासाठी वापरण्यात येणार नाही. नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाल्यानंतर मोबाईल क्रमांक घरामधील इतर सदस्यांना टोकन घेणेकामी नागरिक वापरू शकतात. तसेच केंद्रीय पध्दतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित करण्यात आलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य नाही झाल्यास संबंधित नागरिकांस पुनश्च: नव्याने टोकन घेऊन प्रतिक्षा यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ करावे लागेल. लसीकरण केंद्रावरती नागरिकांना प्राप्त झालेला SMS अथवा KIOSK द्वारे देण्यात आलेली टोकन प्रत दाखवून त्याबाबतची खात्री झाल्यानंतरच लसीकरण करण्यात येईल.
नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता सद्यस्थितीत लसीकरण केंद्रावर देण्यात येणारी टोकन पध्दत बंद करण्यात येणार असून यापुढे सर्व लसीकरण KIOSK संगणक प्रणालीद्वारे निर्गमित करण्यात येणा-या टोकन पध्दतीनुसार राबविण्यात येणार आहे. तसेच KIOSK द्वारे उपलब्ध करून देण्यात येणा-या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा प्राप्त होणार प्रतिसाद विचारात घेऊन KIOSK ची संख्या ही वेळोवेळी वाढविण्यात येणार आहे, असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी केले आहे.