चेअरमनच्या मनमानीपणाला वैतागून सभासदांची उपनिबंधकांकडे धाव…
घटनाबाहय कामकाजाची चौकशी करून ”आम्हाला न्याय द्या”
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० जानेवारी) :- राज्यातील पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतपेढीत कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडत आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि चेअरमन कामगारांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करीत आहेत. कर्ज वाटपात सभासदांना दुजाभाव, तर, हितसंबधितांना वाव दिला जात आहे. नियमबाह्य कामे करून मोठ्या प्रमाणावर संस्थेची आर्थिक लुट केली जात आहे. याउपर कहर म्हणजे सहकार खात्याची नियमावली झुगारून संस्थेसाठी चक्क रेडझोनमध्ये मोकळा भूखंड घेण्याचा प्रताप या कारभाऱ्यांनी केला आहे. या कारभाराला वैतागून पतसंस्थेच्या सभासदांनी थेट पतसंस्थेचे चेअरमन यांच्या विरोधात पुणे सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे थेट पत्राद्वारे पतसंस्थांमधील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला आहे. पत्रावर संस्थेचे सभासद कामगारा च्या सह्या आहेत.
उपनिबंधकांना दिलेल्या पत्रात सभासदांनी म्हटले आहे की, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतपेढीचा कारभार संस्थेचे अध्यक्ष आणि चेअरमन एकटेच अनाधिकारपणे स्वतंत्रपणे हाकीत आहेत. पोटनियमातील तरतुदीनुसार माथाडी मंडळाचे नोंदीत कामगार नसतानाही (राजीनामा झाल्यानंतर) पतसंस्थेचे सभासद अथवा संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. माथाडी मंडळाचे नोंदीत कामगार नसताना राजिनामा झाल्यानंतर सबंधित व्यक्तीचे संस्थेतील सभासदत्व रद्द होणे क्रमप्राप्त असताना पैशाच्या हव्यासापोटी संस्थेचे चेअरमन पांडुरंग बाबूराव कदम यांनी सभासदत्व रद्द केले नाही. गेल्या काही महिन्यापासुन-वर्षापासुन माथाडी मंडळाचे सभासद नसतानाही पतसंस्थेचा कारभार हा एकाधिकारपणे चेअरमन म्हणुन हाकत होते. हा प्रकार घटनाबाहय व सभासद, कामगार आणि पतसंस्थेची फसवणुक करणारा आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
संस्थेच्या नावावर कोणतीही जमिन / मालमत्ता खरेदी करताना त्याला सहकार खात्याची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र संबंधीतानी चेअरमनपदाचा गैरवापर करत जमिन व्यवहार मालमत्ता खरेदी प्रक्रीयेतुन मिळणा-या पैशाच्या हव्यासापोटी रेडझोनबाधित जमिन खरेदी केली. प्रत्यक्षात रेडझोनमधील जमीन खरेदीला शासनाची कोणतीही परवानगी नसते, हे माहित असुनसुध्दा वैयक्तीक स्वार्थापोटी सभासदांचे आर्थिक नुकसान केले. वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेच्या वार्षिक ताळेबंद माहिती सांगण्यासाठी घेण्यात येतात. परंतु, या सभांमध्ये उपस्थितांना अर्धवट माहिती देण्यात येते. इतर संचालकांना वेठीस धरून भल्यामोठ्या अनावश्यक खर्चांना मंजुरी दिली जाते. संचालक मंडळावर बेकायदेशीरपणे नियमबाहय तज्ञ संचालक स्वीकृत करून घेतले जात आहेत. चेअरमन पांडुरंग बाबुराव कदम यांनी वैयक्तीक लाससापोटी स्वतःच्याच मुलाला बेकायदेशीरपणे संस्थेत व्यवस्थापक म्हणुन कामास ठेवुन आवाच्या सव्वा पगार दिला आहे. त्यामुळे सभासदांच्या पैशांचा अपहार होत आहे. संस्थेत नोकर भरती करताना कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता नोकर भरती केली जाते. माथाडी मंडळात नोंदीत कामगार नसताना संस्थेचे सभासद / संचालक / चेअरमन म्हणुन पदे भूषवून सभासदांची दिशाभुल आणि नियमबाहय पद्धतीने कामकाज करून सभासद व संस्थेचे आर्थिक नुकसान केले जात आहे, असेही म्हटले आहे.
कर्ज वाटप करताना चेअरमन मनमानी कारभार व हितसंबंध जपुन कर्जाचे वाटप करतात. सभासदांचे कर्ज मंजूर झाल्यावरही कर्जाची रक्कम देताना आर्थिक देव-घेविसाठी जाणूनबुजून विलंब केला जातो. सभासदांना गरजेच्या वेळी कर्जपुरवठा केला जात नाही. केवळ मुजोरी करणा-या हितसंबंधातील सभासदांनाच वेळेत कर्ज पुरवठा केला जातो. सन २०१४ ला नविन संचालक मंडळ निवडणूक प्रक्रीयेने अस्तित्वात आले. २०१९ साली कारभाऱ्यांची मुदत संपली. कोवीड संसर्गजन्य परिस्थीतीमुळे निवडणुक / सभा / संमेलन यांना बंदी होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्हयातील नामांकीत बँका / विकास सोसायटया / पतसंस्था यांच्या निवडणुका पार पडल्या. कार्यकाल संपुनसुध्दा निवडणूक प्रक्रियेला डावलून चेअरमनपदी पांडुरंग बाबुराव कदम व संचालक मंडळ अद्यापही कार्यरत आहे. पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला जाणूनबुजून विलंब केला जात आहे. सभासदांकडून विचारणा केली असता सहकारातील बडे अधीकारी माझ्या ओळखीचे आहेत, अशी दमबाजी करून सभासदांना कोंडीत पकडले जात आहे. चेअरमन पांडुरंग बाबुराव कदम यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नसताना पतसंस्थेच्या जोरावर कोटयावधी रूपयांची संपत्ती त्यांनी जमा केली आहे. सबंधित चेअरमनवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या गैरव्यवहाराची व घटनाबाहय कामकाजाची चौकशी करून आम्हा शेकडो कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात सभासदांनी म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत त्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री, सहकार आयुक्त / निबंधक, सहकारी राज्य संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग / सेन्ट्रल बिल्डिंग पुणे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर, साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांनाही पाठविल्या आहेत.