शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम आणि संघटन कौशल्याचे मार्गदर्शन करणा-या राजमाता जिजाऊ या आदर्श माता होत्या. माँसाहेब यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले त्याचा अभ्यास देश विदेशातील संशोधक करतात असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेते सचिन चिखले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषदेत बंधूंनो आणि भगिनींनो अशी सुरुवात करुन भारतीय संस्कृतीचा जगाला परिचय दिला. विवेकानंद हे तरुणांच्या शिक्षणासाठी आग्रही असायचे त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते असे सांगून तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचा अभ्यास करुन त्यांचा आदर्श जोपासावा असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.