अरुण बोऱ्हाडे हा श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड ह्या औद्योगिक नगरीमध्ये साहित्य, कला आणि संस्कृतीची रुजविण्याचे आणि फुलविण्याचे काम अनेकांनी केले त्यामध्ये एक सच्चा वारकरी आणि श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती म्हणून अरुण बोऱ्हाडे यांच्याकडे पाहावे लागेल. ज्याप्रमाणे कामगार वस्तू सृजनाचा प्रजापती असतो त्याप्रमाणे साहित्यिक शब्द सृजनाचा सांगाती असतो. कामगार आणि साहित्यिक या दोघांचा संगम अरुण बो-हाडे यांच्यामध्ये पहायला मिळतो असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
बुधवारी (दि. ९ फेब्रुवारी) आकुर्डीतील श्रम शक्ती भवन येथे कामगार नेते व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांच्या ‘अरुणगंध’ या गौरवग्रंथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. देखणे बोलत होते. यावेळी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय कोलते, ‘अरुणगंध’चे लेखक अरुण बो-हाडे, गितांजली बो-हाडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, कामगार नेते डॉ. कैलास कदम, माजी उपमहापौर महंमद पानसरे, प्रकाशक विशाल सोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, उद्योजक संतोष बारणे, माजी सरपंच हरिभाऊ सस्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संदीप तापकीर, आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. देखणे म्हणाले की, अरुण बो-हाडे हे कामगार चळवळीशी जोडलेला हळव्या मनाचा कवी लेखक आहे. हिंदुस्थान अॅन्टी बायोटिक्स मधील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी झुंज देणारा हा कामगारनेता एकीकडे कामगार चळवळीचे प्रभावी नेतृत्व करत होता, तर दुसरीकडे आपल्यातील सर्जनशीलतेने कथा, कविता आणि साहित्याच्या विश्वातही उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती करीत होता. श्रमाच्या घामाने गळणाऱ्या बिंदूतून इथे एक कामगार संस्कृती उभी राहते. ती संस्कृती श्रमजीवी संस्कृती आहे. कामगारांचे हातही निर्मितीचेच असतात, तर साहित्यिकांचे हातही निर्मितीचेच. एक शब्द सृजनाचा सांगाती, तर दुसरा वस्तू सृजनाचा प्रजापती. असे दोन हात एक झाल्यावर निर्मितीचे जे सहजसुंदर; पण वास्तववादी रूप उभे राहते, तेच अरुण बोऱ्हाडे चे साहित्य असते. त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे, एका श्रमसंस्कृतीने शब्दसंस्कृतीला दिलेले आलिंगन आहे.ज्ञानोबा, तुकोबांच्या भक्ती परंपरा, कार्ल मार्क्स, लोकहितवादी महात्मा फुलेंची सुधारणावादी परंपरा, तर कुसुमाग्रज, नारायण सुर्वे यांच्या काव्यसृष्टीची पताका खांद्यावर घेऊन साहित्य आणि श्रमसंस्कृतीच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘अरुणगंध’ इतर नवसाहित्यिकांना व नव लेखक व कवींना निश्चितच प्रेरणा मिळेल असा आशावाद डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केला.
अरुण बो-हाडे आणि त्यांच्या पत्नी गितांजली बो-हाडे यांचा डॉ. देखणे व विजय कोलते यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन दादाभाऊ गावडे यांनी केले.