जबाबदारी ओळखल्यास नेतृत्वगुणांचा विकास: अमिन खान
शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
विद्यार्थी परिषदेच्या स्वीकारलेल्या पदाची कामे नेमकी कोणती ती ओळखून विद्यार्थी प्रतिनिधींनी ती यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि इतरांशी संवाद साधत राहिले पाहिजे. प्रतिनिधित्वाची मिळालेली संधी नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आहे. पदाच्या जबाबदाऱ्या ओळखल्यास नेतृत्वगुणांचा विकासाची दिशा निश्चित होईल, असे प्रतिपादन प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष अमिन खान यांनी केले. येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालयात आयोजित ‘इन्व्हेस्टीचर सिरेमनी’ कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
अमिन खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास संस्थेचे विश्वस्त शैलेश शाह, डॉ. शाळीग्राम भंडारी, रेश्मा फडतरे, राजेश बारणे, विलास भेगडे, प्राचार्या पद्मिनी तेजानी, उप प्राचार्य वैशाली शिंदे आदींच्या हस्ते पदप्रदान करण्यात आले. बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन, मानवंदना, बॅजेस पिनिंग, फ्लॅग मारचिंग आणि सामुदायिक शपथ यामुळे कार्यक्रमाची उंची वाढली. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या जल, अग्नी, पृथ्वी आणि वायू या प्रमुख समित्यांसह इतर शालेय समित्यांच्या नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना बॅज पिनिंग करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष अमिन खान यांनी ‘इन्व्हेस्टीचर सिरेमनी’चे महत्व स्पष्ट केले.
डॉ. भंडारी यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची संधी या पदप्रदान समारंभामुळे हाती आली असून झोकून देत काम करण्याचे आवाहन केले. प्राचार्य पद्मिनी तेजानी म्हणाल्या, की विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा नेतृत्ववान विद्यार्थी घडतील, अशी कामगिरी करून दाखवली पाहिजे. तुमचे काम पाहून इतर विद्यार्थी देखील नेतृत्ववान होतील असे प्रेरणादायी काम करा. शिक्षिका उषा टोनपी व मानसी देशमुख, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम मोरे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अदिती मुदलीयर यांनी केले.