शबनम न्युज | तळेगाव
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्तंभ, पीएमआरडीएचे सदस्य, माजी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या रविवारी (ता. ३०) सकाळी सात वाजल्यापासून नाणोली तर्फे चाकण येथील हिंदकेसरी घाटात भव्य निमंत्रित ‘पुणे जिल्हा केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलगाडा शर्यतीची पूर्व तयारीची पाहणी मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील अण्णा शेळके, बाबू आप्पा वायकर, संतोष भेगडे यांनी केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, युवानेते पार्थ पवार, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या शर्यतीप्रसंगी राहणार आहे.
या निमंत्रित बैलगाडा शर्यतीसाठी श्री डोळसनाथ महाराज मंदिरात गुरुवारी (ता. २७) सकाळी सोडत पद्धतीने गाडा मालकांना टोकन देण्यात आले. या बैलगाडा शर्यतीमधील प्रथम क्रमांकास एक लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकास एक लाख रुपये, फळी फोड गाड्यास कुट्टी मशिन, घाटाचा राजास भव्य चषक, पुणे जिल्हा केसरीला चांदीची गदा आणि मेगा फायनलसाठी दुचाकी अशी लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत. पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांच्यासह नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सदस्य नियोजन करीत आहेत…
वाढदिवसानिमित्त २३ एप्रिलला झालेल्या भेगडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यास भेटवस्तूंऐवजी शालेय साहित्य स्वीकारण्यात आले. भेटवस्तूरूपात जमा झालेल्या शालेय साहित्याचे आगामी शैक्षणिक वर्षात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.