शबनम न्युज | बारामती
बारामती मतदारसंघात नवीन ट्विस्ट आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता बारामती मतदार संघासाठी सुनंदा पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार या राजेंद्र पवार यांच्या पत्नी आहे. अजित पवार यांनीही बारामतीत डमी अर्ज घेतला होता. त्यानंतर सुनंदा पवार यांच्यासाठी शरद पवार गटाने अर्ज घेतला आहे. सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. बारामतीत दोन्ही गटाकडून डमी अर्ज घेतल्याने या ठिकाणी मतदारसंघात ट्विस्ट येणार की काय? अशी ही चर्चा होत आहे
बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबियांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. याठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. परंतु खबरदारी म्हणून अजित पवारांकडून डमी अर्ज आणि शरद पवार गटाकडून सुनंदा पवार यांचा पूरक उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. बारामतीत यंदा पवारविरुद्ध पवार अशी लढत आहे. त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांसह इतर नातेवाईक अजित पवारांविरोधात एकटवल्याचं चित्र उभं राहिले आहे.