पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती; पिंपरी चिंचवड महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
पिंपरी चिंचवड – राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ ची लाट पसरली आहे. कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होत नाही, पुणे जिल्ह्यातील ही परिस्थिती निवारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून येत्या दोन दिवसात ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार असून पिंपरी चिंचवडकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. आज दि. 21 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. सौरभ राव यांच्या उपस्थितीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका पदाधिकारी, आयुक्त यांची बैठलं पार पडली. यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर घुले नानी उर्फ हिराबाई गोवर्धन, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार हिंगे उपस्थित होते.
महापौर उषा ढोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातीत परिस्थिती श्री.राव यांच्याकडे मांडली. शहरात कोविड- १९ प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्णांवर अत्यावश्यक उपचार करण्यात येत आहे. कोविड संसर्ग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत याठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर, भोसरी, जिजामाता हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने कोविड रुग्ण उपचार घेत असून याठिकाणी ऑक्सिजनची गरज भासत आहे. बरोबरीने खाजगी रुग्णालयांमध्ये देखील दोन दिवसांपासून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून मात्र दररोज एफडीए व विभागीय आयुक्त यांच्याबरोबर चर्चा करून लिक्वीड टँकर उपलब्ध केला जात आहे. ही परिस्थिती लवकर निवारण्यात यावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो हॉस्पिटलमध्ये वापरण्यात यावा, अशी सूचना देखील पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन निर्णय घेत आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात येईल. राज्यातील इतर जिल्ह्यातून ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून काळजी करण्याची गरज नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही श्री. राव यावेळी म्हणाले.