‘कोरोना’ संकटाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू – उपमुख्यमंत्री अजित पवार
शबनम न्युज / पुणे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानभवन प्रांगणात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत अंतर पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यावरील कोरोना संकटाविरुध्द राज्य एकजुटीने, निर्धाराने लढत आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्वांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. या वयोगटातील राज्यातील ६ कोटी लोकसंख्या लक्षात घेऊन दोन्ही डोस विचारात घेऊन १२ कोटी डोसचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत अर्थ विभागाने आर्थिक नियोजन केले आहे. लसीकरणासोबतच ऑक्सिजन पुरवठा, बेड व्यवस्थापन, रेमडीसीवीर उपलब्धता, औषधांचा पुरवठा यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. साखर कारखान्यांनाही राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मितीबाबत आवाहन केले आहे. ऑक्सिजन प्लँट उभारुन ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे, तसेच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत आहेत. हे रुग्णसंख्या घटत असल्याचे शुभसंकेत असल्याचे त्यांनी सांगितले.