ऑनलाईन लसीकरणाच्या अडचणींवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचा उतारा
पिंपरी,ता.७ःपिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना लस खरेदीकरिता आज दिला. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत.
शबनम न्यूज / पिंपरी
चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी मार्च महिन्यात सव्वा कोटी रुपये आपल्या आमदारनिधीतून आ. बनसोडे यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना आपला HRCT SCORE किती आहे,हे आता मोफत कळणार आहे. त्यासाठी बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क आहे. आता त्यांनी लस खरेदीसाठीही २५ लाख रुपये दिल्याने कोरोनासाठी सर्वाधिक निधी देणारे ते शहरातील पहिले आमदार ठरले आहेत.या निधीतून आपल्या पिंपरी मतदारसंघातील नागरिकांसाठी लस खरेदी करण्यात यावी,असे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले.
कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या लसीकरण मोहिमेचा सध्या बोजवारा उडाला आहे. बहूतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर, १८ ते ४४ वयोगटात ती टोकन स्वरुपात सुरु आहेत. तेथे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जात आहे. १८ ते ४४ वयोगटाचे हे लसीकरण १ मे ला सुरु झाल्यावर लस व मनुष्यबळाचाही प्रश्न उभा राहण्याची भीती आ. बनसोडे यांनी त्याअगोदर आठ दिवस वर्तवली होती. हा प्रश्न उभा राहणार असल्याने त्यांनी या मोहिमेचे योग्य नियोजन करण्याची सूचना पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांना २३ एप्रिललाच केली होती. ती १ मे लाच शंभर टक्के खरी ठरली. कारण पुरेशा लसीअभावी त्यादिवशी १८ ते ४४ चे लसीकरण सुरु झाले.मात्र.४५ वर्षावरील ते बंद पडले. म्हणून आता आ. बनसोडेंनी या समस्येवर उतारा म्हणून लस खरेदीसाठी २५ लाख रुपये दिले आहेत. यासंदर्भात ते म्हणाले,माझा मतदारसंघ झोपडपट्यांचा आहे. तेथे हातावर पोट असलेला अशिक्षित कष्टकरी गरीबवर्ग राहतो आहे. त्यांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. म्हणून त्यांना ही लस त्याऐवजी थेट दिली जावी म्हणून हा निधी दिला आहे. दुसरं माझं आवाहन असं आहे की,ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार घरगुती गॅसवरील सवलत (सबसिडी) ती परवडणार्यांनी सोडली. त्याचे अनुकरण या लसीच्या बाबतीत होण्याची गरज आहे. त्यामुळे ही लस घेण्याची ऐपत असलेल्यांनी घ्यावी,पण लसीचे पैसे राज्य सरकारकडे जमा करावेत. त्यातून या लसीकरण मोहिमेला बळ मिळणार आहे.