शबनम न्यूज / पुणे
पिंपरी, दिनांक ०७ मे २०२१- सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. बहुचर्चित कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्याचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्या दृष्टीने लहान मुलांच्या सुरक्षिततेकरिता बालरोग तज्ज्ञ, आजार तज्ज्ञ यांचे सल्ल्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांना केली.विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे या ठिकाणी पालकमंत्री अजित पवार यांचेअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हयातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग व प्रादुर्भावासंबंधी बोलताना महापौर माई ढोरे यांनी सध्या रेमेडिसिव्हर चा तुटवडा जाणवत असून ऑक्सिजनची देखील कमतरता भासत असल्याचे नमूद केले. तसेच सर्वसामान्यांपर्यत रेशनिंग धान्य पोहचणे गरजेचे असल्याने त्यासंबंधी योग्य त्या उपाययोजना करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना केली.