मुंबई : आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जितेंद्र बेडकर असं मृत व्यक्तीचं नाव असून अर्पिता असं मुलीचं नाव आहे. जितेंद्रच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो नैराश्येत होता. यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
मुंबईतील विलेपार्लेमध्ये ही घटना घडली. जितेंद्र हा पत्नी, मुलगी, आई आणि भावासह चारकोपमध्ये राहत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात त्याची पत्नी मानवी हिचं कोरोनाने निधन झालं. मुलगी लहान असल्याने जितेंद्र याने डिसेंबर महिन्यात दुसरं लग्न केलं.
विलेपार्ले गावठाण येथे असलेल्या घरात जितेंद्र आणि त्याच्या पत्नीने रहायला जाण्याचं ठरवलं. या घराला रंगरंगोटी करण्याचं काम सुरू होतं.
या कामाची पाहणी करण्यासाठी रविवारी जितेंद्र मुलीला घेऊन विलेपार्ले येथे गेला. सायंकाळी उशिरपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे कुटंबियांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो कॉल उचलत नसल्याने विलेपार्ले येथील शेजाऱ्यांना याबाबत कळविले. शेजाऱ्यांनी दारं आतून बंद असल्याचे सांगितलं. त्यानंतर जितेंद्रचे कुटुंबीय तातडीने विलेपार्ले येथे गेले. त्यांनी दरवाजा तोडला असता जितेंद्र आणि त्याची मुलगी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले.
याबाबतची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलीस घटनास्थळी पोहोचले . पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. जितेंद्रने नैराश्येतून हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. तसंच मुलीला एकटे सोडू शकत नाही म्हणून तिलाही सोबत नेत आहे. या कृतीसाठी कुटुंबाने माफ करावे आणि पत्नीचे झाले तेथेच अंत्यसंस्कार करावे, असं जितेंद्र याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे