पिंपरी, दिनांक १२ मे २०२१ :- १५० ऑक्सीजन बेड आणि १२ व्हेंटीलेटर बेड असणा-या आकुर्डी येथील तसेच २०० ऑक्सीजन बेड आणि १८ व्हेंटीलेटर बेड असणा-या थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी या रुग्णालयांचा उपयोग होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या आकुर्डी आणि थेरगाव येथील रुग्णालयाची पाहणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली. येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. पाहणी दौ-यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे, डॉ. सुनिता इंजिनिअर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास बोरकर, डॉ. धैर्यशील तायडे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय तसेच आकुर्डी आणि थेरगाव येथील रुग्णालयामध्ये एकूण साधारणत: ४८ व्हेंटीलेटर बेड आणि ७३० ऑक्सीजन बेडची व्यवस्था होणार आहे. शहरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महापालिका सर्व पातळीवर उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता तसेच लहान मुले कोरोना बाधित होण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांच्यासाठी जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालयापैकी सर्व सुविधांनी सज्ज असलेले एक रुग्णालय पूर्णत: लहान मुलांच्या उपचारार्थ समर्पित असणा-या स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करा अशी सूचना देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनाला केली.
आकुर्डी गावठाण येथील जागेत सुमारे ३९ कोटी रुपये खर्च करून अद्यावत ५ मजली सुसज्ज रुग्णालयाची इमारत उभारली जात आहे. तर थेरगाव येथील जागेत सुमारे ४८ कोटी रुपये खर्च करून अद्यावत ५ मजली रुग्णालयाची इमारत उभारली जात आहे. या दोन्ही ठिकाणी १० हजार लिटर क्षमतेचे ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आले आहेत. याठिकाणी बसविण्यात येणा-या विविध उपकरणांची तसेच इतर साहित्य आणि सुविधांची पाहणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली.