- विद्युत-गॅस दाहिनी बसवण्यासाठी सव्वाकोटींचा खर्च अपेक्षित
- प्रभागातील चारही नगरसेवकांच्या पाठपुराव्याला आले यश
शबनम न्यूज / पिंपरी
राज्य सरकारने शहरात हायब्रिड पध्दतीच्या दाहिन्या बसवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला 25 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यातील सव्वाकोटी रुपये खर्च करून निगडीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये हायब्रिड पध्दतीची नवीन गॅस व वीजेवर चालणारी दाहिनी लवकरच बसविण्यात येणार आहे. यासाठी प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वपक्षीय चार ही नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केला आहे. त्याला अखेर यश आले असून यापुढे मृतदेहाची होणारी हेळसांड आता कायमस्वरुपी थांबणार आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे दुस-या लाटेत पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज 100 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. आज देखील रोजच्या मृत्युंची संख्या 50 च्या घरामध्ये आहे. मृत्युसंख्या वाढल्यामुळे निगडीतील स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यासाठी अक्षरषः रांगा लावाव्या लागत होत्या. आज देखील तीच अवस्था कायम आहे. कोरोनामुळे कुटुंबातील व्यक्ती दगावल्याचे दुःख पचवता पचवता घायकुतीला आलेल्या कुटुंबियांना पुन्हा स्मशानात मरणयातना भोगण्याची वेळ आली होती. नागरिकांची दयनिय अवस्था पाहून प्रभाग 13 मधील मनसेचे नगरसेवक सचिन चिखले, ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका कमल घोलप, नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रशासनाकडे निवेदने देऊन नवीन शवदाहिनीची मागणी केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, तरी देखील पालिका प्रशासनाला नागरिकांच्या भावना कळाल्या नाहीत. अखेर राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरामधील कोरोनामुळे होणा-या मृत्युंची संख्य पाहून हायब्रिड पध्दतीच्या दाहिन्या तयार करण्यासाठी अनुदानाची घोषणा केली.
राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेला सुमारे 25 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यापैकी 1 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान निगडीतील स्मशानभूमीमध्ये नवीन हायब्रिड पध्दतीची दाहिनी बसवण्यावर खर्ची केले जाणार आहे. 90 लाख रुपये दाहिनीचे युनिट खरेदी करण्यासाठी खर्च होतील. उर्वरीत स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 30 ते 35 लाखांचा खर्च होईल. दोन्ही मिळून सुमारे 1 कोटी 25 लाख एवढा खर्च प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. ही दाहिनी विद्युत आणि गॅसवर कार्यान्वीत होणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर दाहिनी गॅसवर चालवता येणार आहे. त्यामुळे यापुढे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी नातेवाईकांना विजेची वाट पाहावी लागणार नाही.
प्रभाग क्रमांक १३, निगडी अमरधाम स्मशानभुमीवर निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, कृष्णानगर, संभाजीनगर, प्राधिकरण या भागाचा भार आहे. परिसर मोठा असल्यामुळे विद्युत दाहिन्यांवर मोठा ताण येतो. तांत्रिक कारणास्तव वेळोवेळी मृतदेहाची हेळसांड देखील झालेली आहे. याची दखल घेऊन आम्ही चारही विद्यमान नगरसेवकांनी परिसरात नव्याने गॅसदाहिनी व विद्युत दाहिनी बसविण्याची पालिका प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी केली. त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले. आमच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने अनुदान जाहीर केल्यामुळे चारही नगरसेवकांच्या वतीने मी महाविकास आघाडी सरकारचा आभारी आहे.
– सचिन चिखले, नगरसेवक तथा गटनेता, पिं. चिं. मनपा
कोविड 19 विषाणूमुळे मृत्युंची संख्या वाढत चालली आहे. दाहिन्यांवर ताण येऊ लागल्यामुळे राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडमध्ये हायब्रिड पध्दतीच्या गॅस व विद्युतवर चालणा-या दाहिन्या तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी सुमारे 25 ते तीस कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. उपलब्ध जागा आणि त्या-त्या भागातील नागरिकांची गरज पाहून इस्टिमेट तयार केले जाणार आहे. निगडीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये जागा उपलब्ध असून त्याठिकाणी एक युनिट बसविण्यात येणार आहे. त्याकरिता सुमारे 1 कोटी 25 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.
– विजयकुमार काळे, कार्यकारी अभियंता,