पुणे, दि. 21: राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन योग्य त्या सूचना कराव्यात. या सूचना लक्षात घेऊन तशा सुधारणा करण्यात येतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक 12, आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी 3 हजार 317 व अल्प उत्पन्न घटकांसाठी 1 हजार 566 असे एकूण 4 हजार 883 सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते. या सोडतीमध्ये ज्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, त्यांनी निराश होऊ नये, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलेही घराचे स्वप्न पुर्ण होईल असे सांगून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून अत्यंत पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांनी केले.