वाढदिवसाचा खर्च टाळून गरजुंना मदत करण्याचा केला संकल्प
शबनम न्युज / पिंपरी
कोरोना या भयंकर विषाणुमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने अनेकांना पोरकं करून सोडलं. घरातील कर्तव्यप्रमुखाची जबाबदारी पेलणारा व्यक्ती अनाहूतपणे निघून गेल्यामुळे अनेकांची कुटुंबे ढासळली आहेत. त्यांच्या दुखःत सहभागी होऊन भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता कोरोना संकटात सापडलेल्या गरजुंना शक्य तेवढी मदत करण्याचा निश्चय केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणा-या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी टाळून त्यावर अनावश्यक होणारा खर्च न करता गरजुंना आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात माजी आमदार लांडे यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांच्यातील कर्तव्यतत्परता आणि मनमिळावू वृत्ती विरोधकांच्याही मनाला पाझर फोडणारी ठरली आहे. वैयक्तीक कुठल्याही प्रकारची आकसभावना मनामध्ये न बाळगता नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आहोरात्र झटण्याची जबाबदारी या नेत्याने स्वीकारली आहे. कार्यकर्ता वयाने छोटा असो वा मोठा, तो नागरिकांचे प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी आपल्याकडे येतो, ही भावना मनात बाळगून त्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची लांडे यांची धडपड कायम राहिली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे युवक, तरुण आणि ज्येष्ठ वर्गामध्ये त्यांना मानणा-यांची संख्या मोठी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांप्रदायिकता जपली आहे. शैक्षणिक, उद्योग, अध्यात्मिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्राशी त्यांचा वाढलेला संपर्क हा प्रत्येक व्यक्तीला स्नेहधाग्यात गुंफून ठेवणारा ठरला आहे.
त्यामुळे निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींची गर्दी होणे सहाजीक मानले जाऊ शकेल. परंतु, कोरोनाकाळात कोणत्याही कार्यक्रमासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या नियमांचे उल्लंघण होणार नाही, याचे भान देखील त्यांनी जबाबदारीने लक्षात ठेवले आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ, हार-तुरे, श्रीफळ, केक आदींवर होणारा वायफळ खर्च टाळून त्यांनी यातून दिनदुबळ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनासंकटात हाणी पोचलेल्या व्यक्तींना मदत करण्याचे कार्यक्रम सोडले तर त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा कार्यक्रम कुठेही ठेवलेला नाही. आर्थिक मदत, किराणा मालाची किट, औषधांची किट, अन्नधान्य असेल या वस्तू वाटप करताना सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोर पालन करावे, असे देखील आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
भोसरी लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वेगवेगळ्या भागातून आलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्या-त्या फॅकल्टीचा प्राध्यापक वर्ग कार्यरत आहे. कोरोना विषाणुची बाधा होऊन काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचा कौटुंबिक आधार निघून गेला आहे. त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली असून काहींवर कमी वयात कुटुंबाची जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. भोसरी परिसरातील अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांचे पालकत्व माजी आमदार लांडे यांनी स्वीकारले आहे. त्यांचा शैक्षणिक अथवा इतर खर्च महाविद्यालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशा अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना आता लांडे यांच्या रुपाने आधारवड मिळाला आहे.
कोरोना संकटामुळे जवळच्या अनेक नागरीकांना आपल्याला सोडून जावे लागले. अनेकजण अनाथ झाले. तर, अनेकांच्या कुटुंबाचे छत्र हरपले. अशा काळात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्त कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आम्ही शैक्षणिक व आर्थिक मदत करत आहोत. पार्थ दादा पवार सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाबाधीत रुग्णांना बेड, रेमडेसीव्ही इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड व अन्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरथ सुरूच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे या कार्यासाठी मौलीक मार्गदर्शन मिळाले. आता वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्च न करता कोरोना संकटातील गरजुंना मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
– विलास लांडे, माजी आमदार, भोसरी विधानसभा