मुळशी तालुक्यातील रासायनिक कंपनीतील आगीच्या
चौकशीचे आदेश, अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, :- “पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल.
पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.