सांगली : मृत्यूचा प्रसंग कोणावर कसा ओढावेल आणि कधी कोणाला मृत्यू गाठेल हे सांगणं खरंच अवघड आहे. याचा प्रत्यय सध्या आपल्याभोवती घडत असलेल्या अनेक घटनांवरुन येतो. अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील विटामध्ये घडली आहे. विटामधील शाहू नगरमधले रहिवासी असलेले भाजीपाला व्यावसायिक रघुनाथ रामचंद्र ताटे यांचा अशाच दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.
रघुनाथ रामचंद्र ताटे नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीत बसले. गाडीचा स्टार्टर सुरु केला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अचानक ठिणग्या उडून गाडीने पेट घेतला. क्षणार्धातच गाडी पूर्णपणे जळाली.
रघुनाथ ताटे यांना गाडीतून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला. गाडीला लागलेली आग पाहून रघुनाथ यांच्या मुलाने आरडाओरडा केला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रघुनाथ यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला.
रघुनाथ रामचंद्र ताटे हे आपल्या चारचाकी गाडीतून भाजीपाला आणि किराणा सामनाची विक्री करत होते. पहाटे साडेपाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे रघुनाथ ताटे यांनी त्यांच्या गाडीमध्ये भाजीपाला भरला. त्यानंतर हा माल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी घराबाहेर पडले, गाडीत बसले आणि ही दुर्देवी घटना घडली. एका क्षणात होत्याचं नव्हते झाले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे विटा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे