शबनम न्यूज | मावळ
देशाचे भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज दिल्ली येथे आमदार सुनील शेळके यांनी भेट घेतली. यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे, पिं.चिं. नगरसेवक मयूर कलाटे उपस्थित होते.
मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार अपघात होत आहे. कार्ला, भाजे लेणी, लोहगड विसापूर किल्ला, पवना धरण,धबधबे यामुळे तालुक्यात लाखो पर्यटक येत असतात. तसेच दरवर्षी हजारो भाविक एकवीरा देवी दर्शनासाठी येतात. वाढत्या औद्योगीकरणामुळेही या महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी, रस्ते अपघात टाळण्यासाठी सोमाटणे फाटा, वडगाव फाटा,कान्हे, कार्ला इ. महत्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी यावेळी केली. सदर ठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक असून अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. तरी या महत्त्वपूर्ण प्रलंबित विषयावर एमएसआरडीसीकडून संमती मिळावी, अशी विनंती यावेळी आमदार सुनील शेळके यांनी केली. यावर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी आमदार सुनील शेळके यांना दिले.