शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनचरित्रातून व त्यांनी केलेले देशकार्य समजून घेऊन युवा पिढीने प्रेरणा घ्यावी तसेच उपाध्याय यांची एकात्म मानवतावाद संकल्पनेची विचारधारा समजून घेत त्यांचे राष्ट्रीयत्वाचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांनी केले.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आपण सर्व देशवासीयांनी देशाच्या जडणघडणीत ज्या थोर नेत्यांनी आपले योगदान दिले अशा नेत्यांची जीवनचरित्र जाणून घेतली पाहिजे, यासाठी शैक्षणिक संस्थानी विविध अभिनव उपक्रम राबवावेत असे सांगितले. याप्रसंगी बोलताना केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी सांगितले की, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनचरित्रातून विकास हाच राष्ट्रविकासाचा पाया आहे हे तत्वज्ञान लक्षात येते. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी नेहरू युवा केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
यावेळी महापौर माई ढोरे व नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते यशस्वी संस्थेच्या ग्रंथालयासाठी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक देण्यात आले. तसेच दूरदर्शनने तयार केलेला पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावरील माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे संचालक संजय छत्रे यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.