शबनम न्युज | मुंबई
राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा ,असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.
भाजपाने परंपरा कायम राखत अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.