शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र कमी झाला आहे, तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासन वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील दत्तराज कॉलनी, पवार नगर येथे सुरेश भाऊ झेंडे युवा मंच व दत्तराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण अभियान राबविण्यात आले.
सदर अभियान रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू करण्यात आले. या अभियानात दुपारपर्यंत 200 पेक्षा जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला व लसीकरण करून घेतले.
यावेळी शबनम न्यूज प्रतिनिधी यांना प्रतिक्रिया देताना सुरेश भाऊ झेंडे यांनी सांगितले की, हे मोफत लसीकरण अभियान आपण एक सामाजिक बांधिलकी या नात्याने राबवित असून, सध्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मागील दोन वर्षापासून कोरोना काळात आपण जो त्रास सहन केला तो त्रास व अडचणी तसेच कोरोना सारख्या आजाराला हरविण्यासाठी आपण हे मोफत लसीकरण अभियान राबवित आहोत. यावेळी सुरेश भाऊ झेंडे यांच्या सह त्यांचे सहकारी दत्तराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे अनेक नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता आला. यामुळे नागरिकांनीही सुरेश भाऊ झेंडे यांचे आभार व्यक्त केले.