शबनम न्युज | रहाटणी
रहाटणी | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर कोकणे चौक येथील लिनियर गार्डन शेजारी असलेली रुणाल्स दिपमाला सोसायटी मध्ये मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी भेट देऊन नागरिकांच्या सोसायटीच्या अंतर्गत समस्या व बाहेरील समस्या जाणून घेतल्या.
पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन हे नागरिकांसाठी एक वरदान आहे पण काही नागरिकांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने लिनियर गार्डनच्या संदर्भात ओपन जिमसाठी नागरिक पहाटे 4.00पासून रात्री अकरा पर्यंत असतात ते मोठ्याने एकमेकांना ओरडतात आणि मोठ्या आवाजात संगीत लावतात. इथेच पब्लिक स्क्वेअर प्लाझा आहे याठिकाणी ,मोठ्याने संगीत वाजवणे,ग्रुपने डान्स करणे,मध्यरात्री पार्ट्या केल्या जातात,या लोकांच्या गोंधळामुळे सोसायटीतील रहिवाशांना त्रास होत आहे.तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे लोक दारू पिऊन धिंगाणा घालत असतात अशा समस्या नागरिकांनी मांडल्या.या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सोसायटीतील नागरिकांना दिले.यावेळी सोसायटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी तसेच रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.