शबनम न्यूज | पुणे (दि.२३ डिसेंबर) :- सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढावा,यासाठी मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या प्रभागांमध्ये क्षेत्रसभा व्हाव्यात अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे .
‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय ‘,’घर बचाओ ,घर बनाओ आंदोलन’ यांच्यातर्फे क्षेत्रसभेची मागणी करणारे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी देण्यात आले . मुंबई ही राजधानी असल्याने तेथेही क्षेत्रसभा झाल्या पाहिजेत . १९९२च्या ७४ व्या घटनादुरूस्ती नुसार क्षेत्र सभा घेणे बंधनकारक आहे.त्यात आचारसंहितेचा अडथळा येत नाही ,असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे .
निवडणुकींनंतर आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत असे सांगणारे पारदर्शक लोकशाहीचे तत्व अंमलात आणण्याचा मुद्दा राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात मांडावा . लोकशाहीच्या प्रक्रियेत गोरगरीब जनतेला ,सर्वसामान्य मतदाराला सहभागी करून घेणे यासाठी क्षेत्रसभा आवश्यक असून निवडणुकींनंतरही कारभारावर लक्ष ठेवणे मतदारांना सोपे जाईल ,असे मेधा पाटकर यांनी सांगितले .
महानगर पालिका प्रभागातील क्षेत्रसभा संपूर्ण महाराष्ट्रात सूरू कराव्यात ,ते कायद्याने बंधनकारक आहे आणि टाळाटाळ करणाऱ्या नगरसेवकांवर, आयुक्तांवर कारवाई होऊ शकते या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.सह्याद्री विश्रामगृह येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन मंगळवारी देण्यात आले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत , मुंबईसह अनेक पालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढावा, याकरिता १९९२च्या ७४ व्या घटनादुरूस्ती नुसार क्षेत्र सभा घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका पालिका आयुक्त यांच्यावर क्षेत्रसभा करीता सचिव नियुक्त न करून व क्षेत्रसभा घेण्याची जाणिव करून न दिलेल्या सबबीखाली कर्तव्यात कसूरी या महाराष्ट्र म्युनिसिपल अधिनियम१९४९ ,कलम 36/3 नुसार कारवाई होऊ शकते नगरसेवकांसोबत आयुक्तांवरहि कारवाई होऊ शकते अशी माहिती निवेदनात देण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही तात्काळ क्षेत्रसभा घेण्यात यावी, या बाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान , , ‘घर बचाओ ,घर बनाओ आंदोलन’ च्या समन्वयक रेखा घाडगे,पूजा पंडित, पूनम कनोजिया, विश्वंभर मोरे, नंदू पाटील उपस्थित होते.