वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर यांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक २० मध्ये विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले.
या शिबिरांमध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला व या शिबिराला यशस्वी केले. या शिबिराचे उद्घाटन पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांना टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण व्हावे, महिला या चालक म्हणून पुढे याव्यात, कोणतेही वाहन महिलांना चालविण्यास सोपे जावे, सध्या महिला या समाजात सक्षमपणे प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत आहेत. परंतु काही महिलांना वाहन चालविता न आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी वाहन चालविणे हा एक योग्य उपाय असल्याने नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शिबिरास महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व अनेक महिलांनी या शिबिरात सहभाग घेऊन वाहन चालकांचे प्रशिक्षण घेतले.
नगरसेविका वैशाली काळभोर या नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. यानिमित्ताने माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, युवकचे विशाल काळभोर, तसेच राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक २० मधील अनेक नागरिक महिला यांची उल्लेखनीय अशी उपस्थिती होती. या सर्व उपस्थितांचे वैशाली काळभोर यांनी आभार व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी यावेळी वैशाली काळभोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.