शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ मार्च) :- मेट्रो प्रकल्पाचे सीएमआरएस अँड सेफ्टी ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मेट्रो चे उद्घाटन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पुणे शहरामध्ये सामान्य लोकांसाठी मेट्रो चालू होत आहे. ही एक अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे परंतु आमच्या असे निदर्शनास आले आहे की या मेट्रो प्रकल्पाचे सीएम आर एस अँड सेफ्टी रिपोर्ट हे अजून प्राप्त नाहीत. दिनांक ६ मार्च रोजी होणाऱ्या मेट्रो चे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री असे मोठे नेते , अधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. याच पूर्वसंध्येवर इम्रान शेख यांच्या वतीने सीएमआरएस अँड सेफ्टी ऑडिट रिपोर्ट ची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी इम्रान शेख म्हणाले की, सीएमआरएस अँड सेफ्टी ऑडिट रिपोर्ट हे अद्याप ‘महामेट्रो’ अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत अशी शक्यता आहे परंतु आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी भाजपमधील नेतेमंडळी यांनी हे उद्घाटन करण्याचे ठरविले आहे. असे करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या व उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. जर सीएमआरएस अँड सेफ्टी ऑडिट रिपोर्ट हे ‘महामेट्रो’ अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले असतील तर त्यांनी ते आम्हाला दाखवावे व अजूनही या प्रत प्राप्त झालेल्या नसतील तर उद्घाटन सोहळा पुढे ढकलून सीएमआरएस अँड सेफ्टी ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मेट्रो चे उद्घाटन करावे अशी मागणी यावेळी इम्रान शेख यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक चे नारायण पाटील,अमोल रावळकर, प्रशांत काळे, सतेज परब, विनय शिरसागार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.