वृत्तसंस्था
शबनम न्यूज : नवी दिल्ली (दि.०९ मार्च) :- उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. या निकालामुळे केवळ राजकीय पक्षांचा जय पराजयच दिसून येणार नाही. तर देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उत्तर प्रदेशात काय होणार, यावर विशेष करून सर्वांची नजर आहे.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे, या राज्यात सपाची सत्ता येणार की पुन्हा भाजपचा भगवा फडकणार हे सुद्धा उद्याच स्पष्ट होणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता जाणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येतंय. पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्ष सत्तेत येऊ शकतो. गोवा राज्यात भाजपला बंडखोरी आणि अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसकडून भाजपला जोरदार टक्कर मिळेल, असे मानले जात आहे. एक्झिट पोलनुसार या पाच पैकी काही राज्यात वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाच राज्याच्या निकालातून लोकसभा निवडणुकीचा अंदाजही स्पष्ट होणार आहे. उद्या 10 मार्च रोजी या पाचही राज्यांचे निकाल लागणार आहे.