शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ एप्रिल) :- भोसरी गावठाण व पुणे नाशिक हायवे येथे फुटपाथ मोठे व रस्ते छोटे करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी केला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तसेच ई प्रभाग कार्यालय यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, भोसरीतील पुणे नाशिक हायवे वर चांदणी चौक ते आळंदी रोड कॉर्नर पर्यंत तसेच पुढे धावडे वस्ती पर्यंत गेले काही महिने अतिशय संथगतीने फुटपाथ नव्याने तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच कै. अंकुशराव लांडगे सभागृहापासून भोसरी सहल केंद्राच्या कडेने फुगे आळी, भोसरी गावठाण कडून आळंदी रोड कॉर्नर पर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम गेली अनेक महिने अतिशय संथगतीने सुरु आहे ज्यामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे. तसेच यात नियोजनशून्य कारभारही दिसत आहे.
भोसरी सहल केंद्राच्या भिंतीच्या कडेने मोठा 7-8 फुटी फुटपाथ असताना पुन्हा त्याच्या विरुद्ध बाजूस रहदारी वस्तीच्या बाजूने मोठा फुटपाथ बांधून जाण्यायेण्यासाठी रस्ता छोटा ठेवला जात आहे ज्यामुळे भविष्यात त्रास होणार आहे तसेच वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या ही उद्भवणार आहे. भोसरी सहल केंद्राच्या भिंतीलगत 7-8 फुटी फुटपाथ असताना गावठाणातील रहिवासी भागाकडे पुन्हा मोठ्या फुटपाथची गरजच नाही. यामुळे तेथील नागरिकांना रस्त्यावर आपल्या गाड्या लावायला लागतील व त्यामुळे रस्ता अजून कमी दिसेल. त्यामुळे तातडीने प्लॅन मध्ये बदल करावा व फुगे आळी ते धावडे आळी या 300 मीटर रहिवासी भागाकडे फुटपाथ न करता रोडच्या लेव्हलमध्ये सिमेंट ब्लॉक बसविल्यास येथे राहणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा त्रास होणार नाही व रस्ताही मोठा राहील. तसेच राहिलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी विनंती गोडांबे यांनी केली आहे.
तसेच भोसरी गावठाणातील फुगे आळी ते धावडे आळी दरम्यानचा जुना मोठा बंदिस्त नाला साफ न करता रस्त्याचे काम करण्यात येत असल्यामुळे पावसाळ्यात येथे चोकअप होऊ शकते. 2008-09 दरम्यान या नाल्याच्या कामासाठी मी सतत पाठपुरावा केल्यावर पुण्यातील दोन आमदारांनी हा प्रश्न त्यावेळी विधानसभेत तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता व त्यानंतर पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन हा नाला मोठे पाईप बसवून बंदिस्त केला होता.असे गोडांबे यांनी सांगितले आहे.
तसेच पुणे नाशिक हायवेवर शिवाजी महाराज पुतळ्यापासून आळंदी रोड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर अतिशय चुकीच्या पद्धतीने भिंतीपासून सुमारे 10-15 फूट जागा सोडून मग हायवेच्या मध्येच 6-8 फुटी फुटपाथ बांधला जात आहे ज्यामुळे भोसरीतील मुख्य रस्त्यात हायवे अरुंद होऊन वाहतूक कोंडी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इथेही प्लॅन मध्ये तातडीने बदल करून फुटपाथ आत घ्यावा व हायवे वरील रस्ता मोठा राहील हे पाहावे . असेही दिलेल्या निवेदनात गोडांबे यांनी नमुद केले आहे.